नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

नोकरीच्या आमिषाने सांगलीत कोटय़वधींचा गंडा


प्रतिनिधी, श्रीरामपूर  Published: Saturday, November 9, 2013
==========================================
भारिप जिल्हाध्यक्ष फरार, मुलाला अटक
रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांचे निकटवर्तीय व पक्षाचा नगरचा जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कापसे याच्यासह सात जणांच्या टोळीने सांगली भागातील बेरोजगार तरुणांना रेल्वेत नोकरी देण्याचे आमिष दाखवून चार कोटींपेक्षा अधिक रकमेला गंडा घातल्याचे उघड झाले आहे. राहाता पंचायत समितीचा सदस्य असलेला कापसे याचा मुलगा विकी याला पोलिसांनी अटक केली असून, त्याला सात दिवसांची कोठडी देण्यात आली आहे.
मुख्य सूत्रधार राजाभाऊ कापसे फरार झाला असून, त्याचा शोध सुरू आहे. कापसे याने विधानसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढविली होती. शिवसेना, भाजप व रिपब्लिकन पक्षाच्या युतीकडून तो उत्सुक होता. गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या तासगाव मतदारसंघात जाऊन कापसे याच्या टोळीने सुमारे एक कोटीचा, तर पलुस व कुंडल भागांत सुमारे तीन कोटीचा गंडा घातला असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी तासगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक रमेश बनकर, पोलीस उपनिरीक्षक अविनाश नडविणेकरे तपास करीत आहेत.
कापसे टोळी दीड वर्षांपासून सांगली भागात बेरोजगार तरुणांना गंडा घालण्याचे काम करत आहे. गळय़ात सोन्याचे साखळदंड, बोटांत सोन्याच्या अंगठय़ा, खादीचे कडक कपडे अशा वेशात, महागडय़ा मोटारी तसेच सांगली भागातीलच काही दलालांचा लवाजमा घेऊन कापसे फिरत असे. आठवले यांच्यापासून ते अनेक मंत्री, नेते, अधिकारी यांच्याशी जवळीक असल्याचा बहाणा त्यांच्याकडून केला जात असे. रिपब्लिकन पक्षाचा नगरचा जिल्हाध्यक्ष असल्याने; तसेच आठवले यांचा निकटवर्तीय असल्याने तरुणांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. तासगाव भागात सुमारे ७० ते ८० तरुणांना रेल्वेत तिकीट तपासनीस, शिपाई, कारकून अशा पदांवर नोकरी देण्याचे आमिष त्याने दाखविले. तरुणांकडून ७५ हजार ते ३ लाख रुपयांपर्यंत पैसे त्याने घेतले. पलुस व कुंडल भागांतही शेकडो तरुणांना याचप्रकारे गंडा घातला.
पैसे घेतल्यानंतर या तरुणांना रेल्वेतील नेमणुकीच्या प्रशिक्षणाची खोटी पत्रे देण्यात आली. ठाणे व मध्य प्रदेशात नेऊन त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. तीन ते चार दिवसांच्या प्रशिक्षणानंतर या तरुणांना रेल्वेस्थानके फिरवून आणण्यात आली. आता सहा महिन्यांत नेमणूक होईल, असे सांगण्यात आले. नोकरी न मिळाल्याने तरुणांनी पैशाची मागणी केली. अखेर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविण्यात आली. पलुस व कुंडल येथे फसवणुकीचे गुन्हे नोंदविण्यात आले होते, पण कापसे याने अटकपूर्व जामीनअर्ज केल्याने त्यास अटक झाली नव्हती. काल तासगाव पोलीस ठाण्यात सचिन परशुराम मगदूम याने फिर्याद नोंदविली. त्यानुसार कापसे, त्याचा मुलगा विकी, अशोक सुबराव मतकरी (पलुस), चंद्रशेखर आकाराम सावंत (आटपाडी), कैलास उमाजी अवघडे (ठाणे) या पाच जणांवर फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
उपनिरीक्षक नडविणेकरे यांचे पथक श्रीरामपूर शहरात बुधवारी आले. वाकडी येथे जाऊन त्यांनी विकी कापसे याला अटक केली.

आठवलेंकडे तक्रारी..
फसवणुकीचे हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर कापसे याचे धाबे दणाणले होते. फसवणूक झालेल्या तरुणांनी पैशाची मागणी केल्यानंतर सुमारे सव्वा कोटी रुपये परत करण्यात आले होते. पण, उर्वरित रक्कम परत करता न आल्याने अखेर पोलीस ठाण्यापर्यंत हे प्रकरण गेले.