नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

शासकीय टायपिंग अभ्यासक्रम आता संगणकावर

प्रतिनिधी, पुणे Published: Wednesday, November 6, 2013

govt typing syllabus now on computer based


देशात संगणकाचा वापर सर्रास सुरू होऊन दोन दशकांहून अधिक कालावधी झाल्यानंतर, संगणकाची हरघडी अद्ययावत व्हर्जन्स येत असताना, टचस्क्रीन्सही जुने वाटू लागले असताना राज्य शासनाने आता संगणकावरील टायपिंगचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. राज्यातील शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये लिपिक आणि टंकलेखक पदावरील नियुक्तीसाठी टंकलेखन अभ्यासक्रम पूर्ण करणे बंधनकारक असून या पुढे राज्य शासनाकडून संगणकावरील टायपिंगची परीक्षा घेण्यात येणार आहे.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर असल्याचे मिरवणाऱ्या राज्यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना बंधनकारक असलेली टायपिंगची परीक्षा या वर्षीपासून संगणकावर आधारित घेण्यात येणार आहे. शासकीय किंवा निमशासकीय कार्यालयांमध्ये लिपिक किंवा टंकलेखक पदासाठी शासनमान्य संस्थेमधून टंकलेखन अभ्यासक्रम पूर्ण करणे बंधनकारक आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे टंकलेखनाची परीक्षा घेण्यात येते. आतापर्यंत टायपिंग मशिनवर आधारितच हे अभ्यासक्रम होते.

गेल्या काही वर्षांमध्ये राज्यातील कार्यालयांमध्ये टायपिंग मशिनच्या जागी संगणक आले. टाईपरायटर तयार करणाऱ्या कंपन्या बंद पडू लागल्या, मशिनचे सुटे भाग मिळेनासे झाले. मात्र, तरीही राज्य शासनाचा टायपिंगचा अभ्यासक्रम हा टाईपरायटरवरच होता. राज्याने इ-गव्हर्नन्स धोरण स्वीकारूनही दोन वर्षे झाल्यानंतर संगणकावर टायपिंग येणाऱ्या मनुष्यबळाची आवश्यकता असल्याचा साक्षात्कार झाल्याने शासनाने आता टायपिंगचे अभ्यासक्रम चालवणाऱ्या संस्थांमध्ये संगणकावरील टायपिंग अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत. 'कर्मचाऱ्यांना संगणकाचे जुजबी ज्ञान असले, तरी टायपिंगचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण नसल्यामुळे कार्यालयीन कामात परिपूर्णता येऊ शकत नाही. शासनाच्या सर्व विभागांमध्ये इ-गव्हर्नन्स पद्धत अवलंबण्यात येत असल्यामुळे संगणकीय टंकलेखनाचा सराव असलेला कर्मचारी वर्ग उपलब्ध होणे आवश्यक आहे. या पाश्र्वभूमीवर शासनमान्य टंकलेखन संस्थांमध्ये संगणकीय टंकलेखन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे,' असा निर्णय शासनाने काढला आहे.

मराठी, इंग्लिश आणि हिंदी या भाषांमधील संगणकावरील टायपिंगचे अभ्यासक्रम सुरू होणार आहेत. संगणकावरील टायपिंगचा बेसिक अभ्यासक्रम हा सध्या टाईपरायटरवरील टायपिंगच्या अभ्यासक्रमाशी समकक्ष राहणार आहे. सध्याचा वाणिज्य टंकलेखन अभ्यासक्रम म्हणजेच टाईपरायटरवरील अभ्यासक्रम ३० नोव्हेंबर २०१५ पर्यंत टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येणार आहे.