नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

टीईटीसाठी सहा लाख अर्ज

मंगळवार, 12 नोव्हेंबर 2013 - 03:00 AM IST

मुंबई - प्राथमिक शिक्षकांच्या किमान व्यावसायिक अर्हतेसाठी अनिवार्य करण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी राज्यभरातून तब्बल सहा लाख 20 हजार उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज नोंदणी केली आहे. टीईटीसाठी अर्ज करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. रात्री 12 वाजेपर्यंत ही मुदत होती; परंतु सायंकाळपर्यंतच सुमारे 6 लाख 20 हजार ऑनलाईन अर्जांची नोंद झाली. यापैकी चार लाख अर्ज पहिल्या पेपरसाठी; तर उर्वरित पेपर-2 साठी आले आहेत. टीईटी येत्या 15 डिसेंबर रोजी होणार आहे.

कनिष्ठ प्राथमिक म्हणजेच पहिली ते पाचवीच्या शिक्षकांना पेपर-1 आणि वरिष्ठ प्राथमिक म्हणजे सहावी ते आठवीच्या शिक्षकांना पेपर-2 अशा स्वतंत्र प्रश्‍नपत्रिका असतील. दोन्ही गटांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना दोन्ही प्रश्‍नपत्रिका सोडवणे बंधनकारक राहील. या पात्रता परीक्षेच्या निमित्ताने पहिल्यांदाच बीएड झालेल्या उमेदवारांनाही प्राथमिक शिक्षक पदासाठी नशीब अजमावता येईल.

ही परीक्षा घेण्याची जबाबदारी असणाऱ्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डी. व्ही. सहस्रबुद्धे म्हणाले, "यंदा प्रथमच ही परीक्षा होत असल्याने कमी वेळ मिळाला. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रमाणपत्रांच्या कन्फर्मेशनसाठी जिल्हा केंद्रावर यावे लागले. काही उमेदवारांना यामुळे त्रास झाला. पण पुढील वर्षीपासून केंद्रांची संख्या वाढवून याबाबत काळजी घेण्यात येईल. सर्व उमेदवारांना येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत हॉलतिकीट मिळतील. तरीही ज्या उमेदवारांना परीक्षेच्या दिवसापर्यंत ऑनलाईन हॉल तिकीट मिळणार नाही, त्यांना कन्फर्म केलेल्या ऑनलाईन अर्जाची सही शिक्‍क्‍याची प्रत दाखवून परीक्षेला बसता येईल.'

बॅंक चलनची अंतिम मुदत 12 नोव्हेंबर; तर जिल्हा शिक्षण कार्यालयातून कन्फर्मेशन पेज आणि चलन पावती घेण्याची अंतिम मुदत 15 नोव्हेंबर आहे.

सकाळ वृत्तसेवा