नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

गुरुजी परीक्षेपूर्वीच नापास

म. टा. प्रतिनिधी, नागपूर Nov 17, 2013, 01.30 AM
========================================


शिक्षक व्हायचं असेल तर आधी पात्रता परीक्षा पास व्हा, असे म्हणत राज्यशासनाने शिक्षक होण्यासाठी परीक्षा उत्तीर्ण होण्याचे बंधन घातले. ती परीक्षा होईल, काही पास होतील, काही नापास होतील... पण ३३३८ विद्यार्थी शनिवारी परीक्षा न देताच नापास झाले आहेत.

शिक्षक होण्यासाठी शासनाच्यावतीने पात्रता चाचणी उत्तीर्ण होण्याची अट टाकण्यात आली आहे. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याच्या अंतिम तारखेपर्यंत २२ हजार ६५४ जणांनी नोंदणी केली. परीक्षा देण्याची इच्छा व्यक्त केली. ऑनलाइन अर्ज सादर करणाऱ्यांना त्यांच्या अर्जाची हार्ड कॉपी सादर करणे बंधनकारक होते. हार्ड कॉपी सादर करण्याची १५ नोव्हेंबर ही अंतिम मुदत होती. १४ नोव्हेंबरपर्यंत तीन हजारांहून अधिक उमेदवार हार्ड कॉपी सादर करू शकले नाहीत आणि १५ नोव्हेंबर रोजी सुटी असल्याने, हार्ड कॉपी सादर करण्यासाठी एक दिवस मुदतवाढ देण्यात आली होती. त्याचा फारसा फायदा झाला नाही.

हार्ड कॉपी सादर करण्यासाठीच्या आजच्या अंतिम दिवशी भरपूर अर्ज येतील अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांना होती. त्यामुळे त्यांनी सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत अर्ज स्वीकारण्याची तयारी ठेवली होती. प्रत्यक्षात मात्र शनिवारी केवळ २१० जणांनी हार्ड कॉपी सबमिट केली. मुदत संपली तेव्हा १९,३१६ जण हार्ड कॉपी सादर करू शकले. म्हणजेच ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतरही हार्ड कॉपी न देऊ शकलेले ३३३८ उमेदवार परीक्षा देण्यापूर्वीच नापास झाले. ज्यांनी हार्ड कॉपी सबमिट केली, अशा लोकांना त्यांच्या परीक्षेचे प्रवेशपत्र २६ नोव्हेंबरपासून www.mahatet.in या वेबसाईटवर मिळणार आहेत. त्यांची परीक्षा १५ डिसेंबर रोजी होणार आहे.

दृष्टिक्षेपात...
ऑनलाइन अर्जकर्ते : २२,६५४
हार्ड कॉपी देऊ शकले : १९,३१६
परीक्षेला मुकणार : ३३३८