नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

करिअर मेळाव्यांतून बेरोजगारांची फसवणूक

करिअर मेळाव्यांच्या नावाखाली ब्रँडेड कंपन्यांचे लोगो जाहिरातींवर वापरून बेरोजगार तरुणाईकडून नोंदणी रक्कम लाटणाऱ्या संस्थांचा विदर्भात सुळसुळाट झाला आहे. अनेक जिल्ह्य़ांमध्ये करिअर मेळाव्यांचे पीक आले आहे. यासाठी नोंदणीच्या नावाखाली मोठी रक्कम बेरोजगारांकडून घेतली जाते. करिअर फेअरमध्ये लावलेल्या आकर्षक जाहिरातींवर बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या लोगोचा वापर करून त्या कंपन्यांमध्ये नोकरी मिळवून आमिष बेरोजगारांना दाखवले जात आहे. त्यामुळे बेरोजगार अशा करिअर मेळाव्यांच्या जाळ्यात अडकून स्वत:च्या पायावर आर्थिक धोंडा पाडून घेत आहेत. प्रत्यक्षात यापैकी कोणालाही बडय़ा कंपन्यांमध्येनोकरी मिळालेली नाही.

करिअर मेळावा हा आता प्रस्थापित धंदा झाला आहे. मार्केटिंग फंडे वापरून पैसा कमावण्याचे तंत्र अशा संस्थांनी अवगत केले आहे. हाती काहीच लागत नसतानाही बेरोजगार यात अडकत चालले असल्याची स्थिती आहे. मेळावे आयोजित करणाऱ्या या संस्थांच्या विश्वासर्हतेची चौकशी केली जात नाही वा त्यांच्याविरोधात तक्रारीही येत नाहीत. नोकरीच्या शोधातील हजारो बेरोजगारांचे रजिस्ट्रेशनची रक्कम भरून मोठे नुकसान होत आहे. ही रक्कम हजारो रुपयात असते. काही बेरोजगारांनी 'लोकसत्ता' कार्यालयात येऊन या फसवणुकीची माहिती दिली. यापैकी एकाला मोठय़ा पगाराची नोकरी असल्याचे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात कंपनीने ६ हजार रुपयांवर पगार देणार नाही, असे त्याला सांगितले. जॉब रजिस्ट्रेशनसाठी भरलेली रक्कम पाण्यात गेल्याची आपबिती त्याने सांगितली.

अनेक करिअर मेळाव्यांमध्ये रजिस्ट्रेशन करणारा एक विद्यार्थी नाव न सांगण्याच्या अटीवर म्हणाला, दोन वर्षांपूर्वी अभियांत्रिकीचीपदवी ७५ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झालो. करिअर मेळाव्यातील जाहिरातींना भुलून अनेकवेळा रजिस्ट्रेशन केले. दोन वर्षांपासून चांगल्या नोकरीची वाट पाहत आहे. अद्याप कुठूनही कॉल आलेला नाही. सध्या एका मोबाईल कंपनीत विक्री प्रतिनिधी म्हणून ७ हजार रुपये पगारावर काम करीत आहे. असे करिअर मेळावे म्हणजे निव्वळ धूळफेक आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांचे लोगो करिअर मेळाव्यात सर्रास वापरले जात आहेत. बेरोजगारांना जाळ्यात ओढण्यासाठी याचा वापर केला जात असल्याने याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.

करिअर क्षेत्रातील एका तज्ज्ञाशी संपर्क साधला असता असे प्रकार मोठय़ा प्रमाणावर वाढल्याचे त्याने मान्य केले. काही संस्थांचा करिअर मेळाव्यासाठी नोंदणी शुल्क घेऊन महिन्याला कोटय़वधी रुपये कमावण्याचा धंदा झाला आहे. यातून रोजगाराच्या शोधात असलेल्यांचा काहीही फायदा होत नाही. कंपन्यांची गरज आणि अपेक्षा यात कुठेही ताळमेळ बसत नाही. नोकरी असली तरी जेवढा सांगितला जातो तेवढा पगार दिला जात नाही, असेही त्याने स्पष्ट केले. गेल्या वर्षीच्या तुलनेत नागपूर शहरात कॅम्पस सिलेक्शन करण्यासाठी येणाऱ्या कंपन्यांची संख्या यंदा कमी झाली आहे. त्यामुळे अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षांला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. दरवर्षी हजारोंच्या संख्येने विदर्भातील महाविद्यालयांमधून विद्यार्थी-विद्यार्थिनींचे लोंढे नोकरीच्या अपेक्षेने बाहेर पडत आहेत. त्यांच्यापैकी फारच थोडय़ांना नोक ऱ्या उलपब्ध होतात.